आ. सत्तार भाजपच्या वाटेवर? आ. सत्तारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Foto

औरंगाबाद: काँग्रेसने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आ.सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.अब्दुल सत्तार यांनी शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आ.सत्तार यांनी पक्षाच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावत आ.झांबड यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे कालच जाहीर केले होते. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आ.सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करणार काय, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच मतदारसंघातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये औरंगाबादमधून विधान परिषदेचे सदस्य सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर जिल्हाध्यक्ष व सिल्‍लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले. आ. सत्तार हे औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते;पण उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आ.सत्तार यांनी कालच पत्रकार परिषदेत केली. 

मी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांना कळविले आहे. काँग्रेसने एकाही अल्पसंख्यांकाला उमेदवारी दिली नाही. मला औरंगाबाद मतदारसंघ निवडून येण्यासाठी योग्य वाटतो आहे. काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याने आता मला निवडणूक लढविण्याचे व्यक्‍तीस्वातंत्र्य आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करत होतो. काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावोगावी फिरलो. एल्गार यात्रा काढली. कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. एवढे करूनही पक्षाने मला लोकसभेसाठी डावलले. मला विश्‍वासात न घेताच आ.झांबड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे आ.अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

 शिवसेनेने औरंगाबादमधून खा. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली असून, खा.खैरे हे पाचव्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. गेल्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेसचा उमेदवार या मतदारसंघातून सतत पराभूत होत असल्याने ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी खा.शरद पवार व राकाँच्या कार्यकर्त्यांनी केली होती. राष्ट्रवादीचे आ.सतीश चव्हाण येथून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करत होते;पण काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला न सोडता आ.सुभाष झांबड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. खा. खैरे यांच्याविरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसमध्ये आणून तिकीट द्यावे, यासाठी आ.सत्तार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरला होता. मात्र, आ.सत्तार यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी आ.सत्तार यांनी स्वत:च बंडाचे निशाण फडकावत लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.आ.अब्दुल सत्तार यांनी शनिवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. यावेळी नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समजू शकले नाही. आ.सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. सांजवार्ता प्रतिनिधीने आ.सत्तार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला;पण संपर्क होऊ शकला नाही.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker